जेव्हा ट्रॅफिक पोलिसांनाच होतो दंड

लखनौ : वृत्तसंस्था – पार्किंगची समस्या ही आता केवळ एका शहरापुरती राहिलेली नाही. वाहनांना पार्किंगसाठी जागा नसणे, त्याचबरोबर बेजबाबदारपणे वाहने पार्क करणे आपल्याकडे काही कमी नाही. पण, वाहतूक पोलीसच नियम पाळत नसल्याने आपल्याच वाहतूक शाखेच्या सहकाऱ्यांवर दंड करण्याची पाळी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यावर आली.

त्याचे असे झाले की, वाहतूक शाखेच्या लीला चौकीचे इंचार्ज राहुल सोनकर हे रविवारी दुपारी सहारा गंज मॉलच्या बाहेर नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करुन त्यांची पावती फाडत होते. त्याच दरम्यान हजरतगंज भागाचे पोलीस अधिकारी अभयकुमार मिश्रा हे सहारागंज पोलीस बुथवर पोहचले. बुथच्या बाहेर पोलीस चौकीच्या इंचार्जची गाडी पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. कारण ती गाडी नो पार्किंगमध्ये उभी होती.

त्यांनी पावती पुस्तक मागवून त्या गाडीची पावती करायचा आदेश दिला. ही गोष्ट त्यांच्या शिपायाने जवळच पावत्या फाडण्यात गुंग असलेले राहुल सोनकर यांच्या कानावर घातली. ते धावतच तेथे आले. त्यांना पाहून मिश्रांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितले की, जर पोलीस विभागाचे लोकच नियमांचे असे उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्य लोक काय करणार?.

गाडीची पावती फाडल्यानंतर त्यांनी ती कार सहारा गंज मॉलच्या पार्किंगमध्ये जाऊन उभी केली.