चंद्रपुरात बांबूपासून बनविलेला तिरंगा देश-विदेशात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रजासत्ताक दिन अगदी चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याची जय्यत तयारी सर्वत्र सुरु आहे.  त्यानिमित्ताने ठिकठिकाणी झेंडे पाहायला मिळतात. चंद्रपूरच्या बांबू संशोधन केंद्रात तयार करण्यात आलेला झेंडा आता परदेशात जाणार आहे.

“आम्ही आमच्या हाताने तयार केलेला बांबूचा राष्ट्रध्वज आज केवळ भारतातच नाही तर विदेशात पोहोचला आहे, याचा आम्हाला गर्व आहे. भारतीय तिरंगा हा आमचा अभिमान आहे तर तो तयार करण्याच्या निमित्ताने सुरु केलेला स्वरोजगार हा आमच्यासाठी स्वाभिमानाचा विषय आहे” अशी प्रतिक्रिया राष्ट्रध्वज तयार करणारे कारागीर सर्वश्री कमलकिशोर गेडाम, अविनाश मसराम आणि अश्विनी मसराम यांनी दिली आहे.

चंद्रपूर येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांतर्गत सुरु करण्यात आलेल्या बांबू हॅण्डिक्राफ्ट ॲण्ड आर्ट युनिटमध्ये बांबूपासून विविध शोभिवंत वस्तू तयार करण्याचे आम्ही प्रशिक्षण घेतले आणि स्वयंरोजगाराची वाट चोखाळली. आपल्या हातातील कौशल्याने, कलाकुसरीने आपल्या देशाचा राष्ट्रध्वज बनवताना खूप आनंद वाटतो. एक राष्ट्रध्वज बनवण्याकरिता ४ ते ५ तास लागतात. असे ते अभिमानाने सांगतात.

चिचपल्लीच्या बांबू संशोधन केंद्रात सध्या ५ ते ६ कारागीर बांबूचा राष्ट्रध्वज तयार करतात राष्ट्रध्वज तयार करणारे आज येथे ५० कारीगर तयार झाले आहेत या केंद्रातून बांबूपासून विविध हस्तकौशल्याच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, त्यात राष्ट्रध्वजाची निर्मिती हा एक भाग आहे. आतापर्यंत १ हजार ५०० राष्ट्रध्वजाची निर्मिती आपण केली आहे. हे तीन प्रकारचे आणि आकाराचे असतात. बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले, बांबू प्रशिक्षण केंद्राने आतापर्यंत १०.५ इंच आकारचा, १६.५ इंच आकाराचा आणि ७ फूट उंचीचा राष्ट्रध्वज बांबूपासून तयार केला आहे.

विशेष म्हणजे प्रशिक्षण केंद्राने तयार केलेले या तीन ही आकारातील बांबूचे राष्ट्रध्वज मंत्रालयात, विधानभवनात, संसद भवनात, राष्ट्रपती भवनात व इतर शासकीय-निमशासकीय कार्यालयात पोहोचले आहेत.

याशिवाय मोझबिक, स्वीडन, चीन व सिंगापूर यासारख्या इतर देशातही पोहोचले आहेत. सात फुटाचा राष्ट्रध्वज राष्ट्रपती कार्यालय, प्रधानमंत्री कार्यालय, अर्थमंत्री अरूण जेटली यांचे कार्यालय, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांचे कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, राज्यपालांचे कार्यालय यांच्याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन, यांना देण्यात आला आहे.