‘…तर भंडारदर्‍याचा एकही थेंब खाली जाऊ देणार नाही’

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – काही लोकांनी आ. पिचड यांच्यावर जी चिखलफेक चालू केली, ती त्वरित बंद करावी. अन्यथा यापुढे भंडारदरा धरणाच्या पाण्याचा एकही थेंब खाली येऊ देणार नाही, असा सज्जड इशारा घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, साम्रद, रतनवाडी, मुतखेल, कोलटेंभे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, शेंडी, भंडारदरा परिसरातील आदिवासी शेतकर्‍यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उत्तर नगर जिल्ह्याला वरदायी ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पायासाठी व निर्मितीसाठी आमच्या आदिवासी शेतकर्‍यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. आम्ही आमचे सर्वस्व योगदान दिलेले आहे. ज्या पिचड घराण्याने आमचे संसार उद्ध्वस्त होत असताना आमच्या विकासासाठी संपूर्ण हयात खर्ची घातली आहे. अशा आमच्या नेत्यांचा म्हणजेच आ. पिचड  यांचा संगमनेर, राहाता व कोपरगाव तालुक्यातील काही शेतकरी पाणी मिळावे, यासाठी निषेध करीत आहे, ही बाब चीड आणणारी आहे.
आज भंडारदर्‍याच्या बुडीत क्षेत्रामध्ये आमच्या शेतीला तर नाहीच पण पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नसताना आम्ही तुमच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी योगदान दिलेले आहे, याची आपण कोणतीही जाणीव ठेवलेली दिसत नाही. आ. पिचड यांची तालुक्यातील जनतेबरोबर व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबरोबर राहण्याची भूमिकाही आपण समजून घेणे आवश्यक होते. त्यांचा आपल्याला पाणी मिळू नये, असा कोणताही हेतू नाही. मात्र आपल्याला पाणी देताना तालुक्यातील शेतकरी भूमिहीन होऊ नये, त्यांची शेती उद्ध्वस्त हाऊ नये व पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी त्यांचा मुख्य कालवे हे तालुक्याच्या हद्दीपर्यंत बंदिस्त पाईपमधून न्यावे ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. हा संघर्ष तुमच्या विरोधात नसून शासनाच्या धोरणाविध्द् आहे.
तुमचा गुंठाही गेलेला नाही
संगमनेर, कोपरगाव, राहाता या तालुक्यांनी धरणग्रस्तांच्या पूनर्वसनासाठी १ गुंठाही जागा दिलेली नाही. तसेच त्यांच्या मुलांना कोणत्याही संस्थेत कामावर घेतलेले नाही. आपले कोणतेही योगदान नसताना आपण आमच्या नेत्याचा निषेध करीत आहात, ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे. तसा कोणताही नैतिक अधिकार आपल्याला नाही, असे म्हटले आहे.