महिला पोलिस उपनिरीक्षकास 25 हजाराची लाच घेताना अटक

वर्धा ः पोलीसनामा ऑनलाईन

वर्धा जिल्हयातील सेलू पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस उपनिरीक्षकास 25 हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. महिला पोलिस उपनिरीक्षकास अटक करण्यात आली असून तिच्याविरूध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास झाली आहे.

राजश्री तुकाराम रामटेके असे अटक करण्यात आलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. रामटेके या वर्धा जिल्हयातील सेलू पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. पोलिस ठाण्यात एका व्यक्‍तीविरूध्द गुन्हा दाखल झालेला होता. दाखल गुन्हयात अटक संबंधिताला अटक न करण्यासाठी महिला उपनिरीक्षक राजश्री रामटेके यांनी ज्याच्या विरूध्द गुन्हा दाखल आहे त्याच्या भावाकडे 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्‍त झालेल्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये उपनिरीक्षक राजश्री रामटेके या 25 हजाराची लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सापळा रचला. त्यावेळी आरोपी महिला उपनिरीक्षक रामटेके यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून त्यांच्या भावाला दाखल गुन्हयात अटक न करण्यासाठी 25 हजार रूपयाची लाच स्विकारली.

एसीबीच्या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांना 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षकाने तब्बल 25 हजाराच्या लाचेची मागणी करून ती स्विकारल्याने जिल्हयासह पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.