आयुर्वेद परिपूर्ण असल्याचे जगाने मान्य केले : डॉ. आव्हाड 

पुणे : पोसीसनामा ऑनलाईन – उपचाराच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रसायने पोटात कोंबल्याने शरीराचे होणारे नुकसान फक्त आयुर्वेदच टाळू शकते, आयुर्वेद ही परिपूर्ण उपचार पद्धती असल्याचे आता जगानेसुद्धा मान्य केले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामदास आव्हाड यांनी केले.

नैसर्गिक उपचार आणि आयुर्वेदाची जोड असलेल्या केरळीयन पंचकर्म या उपचार पद्धतीची सुविधा पश्चिम विदर्भात प्रथमच अकोल्यात होत असून, तिचा प्रारंभ आयुर्वेद तज्ज्ञ आणि साईप्रभा हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन धनोकार यांच्या महाजनी प्लॉटमधील केंद्रात झाला. आयएसओ मान्यताप्राप्त मल्टी स्पेशालिटी केरळीयन पंचकर्म हॉस्पिटलचे लोकार्पण, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामदास आव्हाड यांच्या हस्ते, डॉ. अभय पाटील, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. अंजली आव्हाड, युकॉंचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रारंभी डॉ. नितीन आणि डॉ. अंजली धनोकार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. अभय पाटील, डॉ. आशुतोष गुप्ता यांची भाषणे झाली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन हॉस्पिटलच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

हत्तीरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण : डॉ. रमेश गवाले

यावेळीे डॉ. रामदास आव्हाड यांचे ‘आजची जीवन शैली आणि आयुर्वेद’ या विषयावर व्याख्यान झाले. हॉस्पिटलच्या वेबसाइटचे डॉ. अभय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पंचकर्म विभागात अद्ययावत केरळीयन यंत्र सामग्री आणि प्रशिक्षित केरळीयन थेरपिस्ट उपलब्ध राहणार आहेत. संपूर्ण संगणकचलित व्यवस्था असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये सौदर्य चिकित्सा, योग साधना आणि आहार सल्ला, या सोबतच सुवर्ण प्राशन संस्कार, गर्भसंस्कार मार्गदर्शन, उपचार आणि विविध पंचकर्म योजना उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे डॉ. धनोकार यांनी सांगितले. सामान्य रुग्णांना माफक दरात आणि समाधान मिळेल अशा स्वरूपात हे उपचार अकोल्यात उपलब्ध करण्याचे आपले स्वप्न या निमित्ताने पूर्ण होत असल्याची भावना डॉ. धनोकार यांनी व्यक्त करून आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन सीमा तरालकर यांनी केले.