आत्महत्या करण्यास निघालेला तरुण पोलिसांमुळे वाचला!

हडपसर : पोलीसनामा ऑनलाइन

हॉटेलात काम करणारा एक तरुण जीवनास कंटाळून आत्महत्या करण्यास निघाला होता, पण हडपसर पोलिसांनी वेळीच दखल घेवून शोधाशोध केल्याने त्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आले.

नर्हे आंबेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये हणमंत ( नाव बदलले आहे) नावाचा एक तरुण काम करत होता. तो कर्नाटक राज्यातील एका गावातून पुण्यात आला होता आणि हडपसरमध्ये आपल्या नातेवाईकाकडे राहत होता.आज त्याने जीवनास कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, तसा एसएमएस त्यांनी आपल्या नातेवाईकास पाठवला होता, हा एसएमएस वाचून नातेवाईक घाबरले आणि त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठले, त्यांनी घडलेली हकीकत सपोनि संदीप देशमाने यांना सांगितली. देशमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर तरुणाचा शोधाशोध सुरू केला, माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यने सदर तरुण नर्हे परिसरात असल्याचे कळताच नातेवाईकांनी पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली त्या भागात धाव घेऊन त्यास ताब्यात घेतले.

पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून एका वैफल्यग्रस्त तरुणाचे प्राण वाचवल्याबद्दल हणमंतच्या नातेवाईकानी सपोनी संदीप देशमाने व सहकार्यांचे आभार मानले.