महिलेचा आंघोळ (अर्धनग्न) करतानाचा व्हिडीओ काढणे तरुणाला पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील बालेवाडी परिसरात एका महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढताना एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.३०) सकाळी पावणे सात ते साडेसातच्या दरम्यान घडली.

जयवंत हरिभाऊ बोराडे (वय-२७) याला पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजुर केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयवंत हा काही दिवसांसाठी त्याच्या बहिणीकडे राहण्यासाठी आला आहे. रविवारी सकाळी मॉर्नींग वॉकसाठी जात असताना त्याला पीडित महिला बाथरुममध्ये आंघोळ करताना दिसली. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली.

दरम्यान, खिडकीतून आपल्याला कोणीतरी पाहत असल्याची जाणीव पीडित महिलेला झाली. तीने लगेच याची माहिती पतीला दिली. पतीने खिडकीजवळ जाऊन पाहिले असता आरोपी जयवंत हा त्याठिकाणी उभा होता. त्याच्याकडे चौकशी करुन त्याच्या हातातील मोबाईल घेऊन पाहिले असता तो पत्नीचा व्हिडीओ बनवत असल्याचे आढळून आले. त्याने आजूबाजुच्या लोकांना बोलवून घडलेला प्रकार सांगितला. नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.