छेडछाड करणाऱ्या तरुणाने पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसावर केला हल्ला 

बीड : पोलिसनामा ऑनलाईन
सकाळी सात वाजता बीड बस स्थानकावर आईची वाट पाहत बसलेल्या एका अल्पवयीन मुलीस तरुणाने छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छेडछाडीनंतर मुलगी भीतीपोटी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचली, तरुणही तिचा पाठलाग करत अधीक्षक कार्यालयात पोहचला. मुलीचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच मदतीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर तरुणाने कत्तीने हल्ला करून तेथून पळ काढला.
याप्रकरणी तरुणाच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस कर्मचारी सुशीलकुमार कोळेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
अशी घडली घटना 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , सोळा वर्षीय मुलगी पुण्यावरून आई येत असलेल्या बसची वाट पाहत बीड बस स्थानकात बसली होती. त्यावेळी एक येरार नामक तरुण त्याठिकाणी आला आणि मुलीस म्हणाला , ‘मला तू आवडतेस ,मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.’ असे बोलत छेड काढली. त्याला मुलीने विरोध केला असता  त्याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली. मुलगी घाबरून पळत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली ,तरुणानेही तिचा पाठलाग सुरु केला. पोलीस अधीक्षकांच्या दारात थांबलेले पोलीस कर्मचारी कोळेकर यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तरुणास अडवले. यावेळी तरुणाने तेथील एक कुंडी उचलून कर्मचाऱ्याच्या दिशेने फेकली. कोळेकर यांनी त्याला पकडले असता ,तरुणाने त्याच्याकडील कत्तीने (धारदार शस्त्र) कोळेकर यांच्यावर वार केला आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून आरोपी पोलिसांवर हल्ला करून पसार होतो ,याबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरु असून आश्चर्य व्यक्त होत आहे.