कोरेगाव भीमा मधील व्यायामशाळेच्या साहित्याची चोरी

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे युवकांच्या व्यायामासाठी बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेतील साहित्याची चोरी झाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा येथील व्यायाम शाळेत यापूर्वी माजी आमदार बाबुराव पाचार्णे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून व्यायाम शाळेसाठी साहित्य देण्यात आले होते, सदर व्यायाम शाळा ही युवकांचे व्यायामासाठी खुली ठेवण्यात आलेली असते. सकाळी व्यायामशाळेचे व्यवस्थापक अविनाश देवकर व्यायाम शाळेत गेले असता त्यांना व्यायाम शाळेतील अनेक साहित्य नसल्याचे आढळून आले तसेच काही सामान साहित्यांची तोडफोड केल्याचे त्यांना दिसले, त्यानंतर व्यायाम शाळेत चोरी झाल्याचे देवकर यांच्या लक्षात आले. याबाबत अविनाश उत्तम देवकर नरेश्वर वस्ती कोरेगाव भीमा ता. शिरुर जि.पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून याबाबतीत पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.