धार्मिक स्थळे रात्रीत पाडून लोकांच्या भावनांशी खेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे रात्रीच्या वेळी परिसरातील लोकांच्या घरांना बाहेरुन कड्या लावून पाडण्याच्या प्रशासनाच्या धोरणाचा सोमवारी महापालकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी जोरदार टिका केली. प्रशासनाने लोकप्रतिनिधीं, पक्षनेत्यांशी चर्चा न करता रात्रीत केलेल्या या कारवाईचा नगरसेवक गफूर पठाण यांनी निषेध केला. कोर्टाचा आव आणून लोकांच्या भावना दुखविल्या असून यातून जाती जाती, धर्माधर्मा कटूता निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

गफूर पठाण म्हणाले, हे सरकार शिवाजी महाराजांच्या नावाने कारभार करीत असल्याचे सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी मशिदी बांधल्या, मंदिरे बांधली. त्यांनी कधी दोन धर्मात तेढ निर्माण केला नाही. महापालिकेत अडचणीच्या प्रश्नावर विशेष सभा होतात. तर चर्चा करुन त्यावर निर्णय घेतला जातो़. पक्षनेत्यांना विश्वासात न घेता अशी रात्री कारवाई करण्याचा प्रशासनाने काहीच कारण नव्हते. काही जणांच्या फायद्यासाठी प्रशासनाने असे करायला नको होते. कोठे तरी त्याचे वेगळे पडसाद पडतात. सर्व जाती धर्माचा विचार घेऊन भावना दुखविल्या जाणार नाही, अशा प्रकारे कारवाई केली जावी़ कारवाई का केली नाही असा कोर्टाने प्रश्न केल्याचे सांगितले जाते. कोर्टाचा आव आणून लोकांच्या भावना दुखविण्याचा अधिकार नाही. सर्वांनी बसून त्यातून मार्ग काढला आला असता. घटना एवढी महत्वाची होती का की रात्रीत मंदिर पाडण्याची आवश्यकता होती. या रात्रीच्या कारवाईचे खापर एकावर जाता कामा नये.

या सभेत भाजपचे सदस्यही संतप्त झाले होते. धीरज घाटे यांच्यासह चेतन तुपे, संजय भोसले, वसंत मोरे यांचीही भाषणे झाली. महापालिका आयुक्त यांनी २००९ च्या नंतरची अनधिकृत प्रार्थनास्थळे (त्यात सर्व आले) ठेवायची नाहीत. त्याआधीच्या १ मे १९६९ पासूनच्या प्रार्थनास्थळांची अ.ब.क. अशी वर्गवारी करायची होती. ती करुन त्याप्रमाणे सर्वाच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही कारवाई केली जात आहे.