आज ते भाऊ बनून आले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपके उमर के हजारो लडके हमारे एरिया मे गिऱ्हाईक बन के आते है, अच्छा लगा आज कोई भाई बन के भी आया, ही आहे समाजातील एका वचिंत आणि दुर्लक्षित समाज घटकातील महिलेची स्वाभाविक प्रतिक्रिया. बहिण भावाच्या नात्याचे अनोखे बंधन म्हणजे भाऊबीज. अनेक संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाऊबीज साजरी करुन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही देत असतात. पण ही भाऊबीज काहीशी वेगळी होती. त्या गल्लीतून सामान्य माणूस चुकूनही जाण्याचा प्रयत्न करत नाही. अशा ठिकाणी काही युवक आज भाऊ म्हणून मुद्दाम गेले. बुधवार पेठेतील देवदासी महिलांसोबत त्यांनी भाऊबीज साजरी केली.

वीर हनुमान मित्र मंडळ आणि वंदेमातरम संघटना कृत युवा वाद्य पथकाच्या वतीने बुधवार पेठ परिसरातील देवदासी महिलांसोबत भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवदासी महिलांना आपल्या विषयीही कोणाला काही तरी वाटत आहे, हे समजल्याने त्या भांबावून गेल्या होत्या. अनेक वर्षे देहविक्री व्यवसाय करणाऱ्या  या महिलांशी कोणी नाते ठेवण्याचा प्रयत्न करत नाही़ काम झाल की प्रत्येक जण आपला रस्ता पकडतो. अशावेळी आलेल्या या युवकांना ओवाळताना काही महिला भावनावश झाल्या होत्या. या युवकांनी त्यांना भेटवस्तू दिल्या. त्याचबरोबर लाख मोलाचा भावनिक आधार देत आम्ही आपल्या पाठीशी उभे असल्याची जाणीव करुन दिली.

यावेळी फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे,, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील आणि वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी, इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.