हा मृतदेह तुमच्याच रुग्णाचा…जिवंत रुग्णाचेच बनवले मृत्यू प्रमाणपत्र, सरकारी रुग्णालयाचा प्रताप 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मयत झालेल्या दुसऱ्याच रुग्णाचा मृतदेह तुमच्याच रुग्णाचा आहे असे सांगून मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या सरकारी रुग्णालयाच्या प्रशासनाने मंगळवारी चांगलाच गोंधळ घातला. ज्याचा मृतदेह असे सांगण्यात आले तो रुग्ण जिवंत आहे. मात्र तोच मृत झाल्याचे प्रमाणपत्र सिव्हिल प्रशासनाने दिले. या गोंधळाचा रुग्णाच्या नातेवाईकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव येथील अविनाश उर्फ चिलू दादोबा बागवडे वय (55) हे दहा दिवसापूर्वी सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आले होते. सोमवारी रात्री अडीचच्या दरम्यान बागवडे यांचा मृत्यू झाला आहे, असे रुग्णालयातून नातेवाईकास फोनवरून कळवण्यात आले. मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे आहे त्यामुळे तुम्ही तात्काळ या असे नातेवाईकांना फोनवर सांगण्यात आले. त्यानंतर नातेवाईक तातडीने सांगलीत आले. त्यांना थेट उत्तरीय तपासणी कक्षात नेण्यात आले. तेथे बागवडे यांच्या पुतण्याने हा मृतदेह अविनाश बागवडे यांचा नसल्याचे सांगितले. तरीही उत्तरीय तपासणी करून त्यांना जबरदस्तीने मृतदेह ताब्यात घेण्यास भाग पाडले. यावेळी नातेवाईकांना बागवडे यांच्या मृत्यूचा दाखलाही देण्यात आला आहे. बागवडे मात्र रुग्णालयात उपचार घेत आहेत.

यानंतर नातेवाईकांनी मृतदेह तासगवला नेला. तेथे सर्वच नातेवाईकांनी तो मृतदेह अविनाश बागवडे यांचा नसल्याचे सांगितले. मंगळवारी दुपारी संतापलेले नातेवाईक त्यांना दिलेला मृतदेह घेऊन परत सांगलीत आले. त्यांनी सिव्हिल प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. सरकारी दवाखान्यात या प्रकरणाचा अजूनही गोंधळ सुरू आहे.