कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना भारतातील ‘ही’ कंपनी देणार 5 वर्षांचा पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेली महिंद्रा अँड महिंद्राने कोरोनाकाळात कंपनीतील कर्मचारी तसेच कोरोना रुग्णांसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कंपनीतील कर्मचा-यांच्या वारसांना 5 वर्षाचा पगार देण्याचा मोठा निर्णय कंपनीने घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनीश शाह यांनी आपल्या कर्मचार्‍यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे.

अनीश शाह यांनी महिंद्रा समुहातील सुमारे 25 हजार कर्मचाऱ्यांना हे पत्र लिहल्याचे समजते. महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचार्‍यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. यात कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी 2 लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे. तसेच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याचे 5 वर्षांचं वेतन आणि वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम देण्याचे जाहीर केले आहे.

कोरोनामुळे पीडित असलेल्या कुटुंबांवरील ओझे थोडे कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही. तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज असल्याचे या पत्रात म्हटले आहे.