हे लाेक गजवा-ए-हिंदचे एजंट’ : ‘त्या’ भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य 

मुबंई : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर येथली पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर पूर्ण देशातील जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केल्याचे दिसून आले होते. यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना त्यांनी  नसरुद्दीन शाह आणि कमल हसन यांच्यावर आपली तोफ डागली.

गिरीराज सिंह म्हणाले की, “पाकिस्तानात गजवा-ए-हिंदची चर्चा होत होती. याचा अर्थ भारताचे इस्लामीकरण असा होता. पुलवामा हल्ल्यानंतर याला गती मिळाली आहे. आपले दुर्देव आहे की, भारतात नसरुद्दीन शाह आणि कमल हसन सारखे लोक पाकिस्तानचे एजंट बनले आहेत. जे ही गजवा-ए-हिंदची भाषा करतात.”

गिरीराज सिंह यांनी यापूर्वीही पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढवला होता. ते म्हणाले की, “सिद्धू राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरुन अशी विधाने करीत आहेत. काँग्रेसकडून मतांसाठी अशी विधाने होत आहेत. सिद्धू यांचे विधान लोकशाहीसाठी नव्हे तर मतशाहीसाठी आहे. मात्र, भारतीय सेनेच्या शौर्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे” असेही ते यावेळी म्हणाले.