बाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येक स्त्री देवाकडे प्रार्थना करत असते की आपल्या बाळाला जन्मदोष ही समस्या होऊ नये, कारण बाळाला जन्माला घातल्यामुळे जरी प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा आनंद मिळत असला तरी जन्मदोष या समस्येमुळे तिच्या आनंदावर विरजण पडते. जन्मदोष म्हणजे आईच्या गर्भातच बाळामध्ये काही आजार उद्भवतात किंवा बाळ सामान्य स्थितीत नसते त्यास जन्म दोष म्हणतात. विशेष म्हणजे 1000 पैकी 61 ते 69 बाळांमध्ये जन्मदोष आढळत असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

सगळ्यांना हा प्रश्न पडत असतो की आपण हे रोखू शकतो का? तर याच उत्तर हो असे आहे, गरोदरपणातच स्त्रिया यावर उपाय करू शकतात, जेणेकरून बाळामध्ये जन्मदोष होणार नाही. आपण आज या लेखातून अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या गरोदर स्त्रीने केल्यास तिच्या बाळात जन्मदोष आढळणार नाही.

जन्मदोष म्हणजे काय ?
जन्मदोष हा एक विकार असून यास बर्थ डिफेक्ट किंवा कोंजेनिटल डिसऑर्डर देखील म्हटले जाते. जन्मदोषामुळे बाळात मानसिक वा शारीरिकदृष्ट्या समस्या प्रामुख्याने दिसून येत असतात. अशी स्थिती जन्मजातच विकसित होत असते. यामध्ये बाळाचा एखादा कुठलाही अवयव व्यवस्थित विकसित न होणे, नाक किंवा ओठ असे अवयव पूर्णपणे न विकसित होणे, बुद्धीदोष असणे अशा प्रकारच्या स्थिती दिसून येतात.

जन्मदोष हा दोन प्रकारात विभागला गेला आहे. पहिला म्हणजे संरचनात्मक दोष आणि दुसरा म्हणजे कार्यात्मक दोष होय. संरचनात्मक दोषामध्ये शरीराचा एखादा अवयव चुकीच्या पद्धतीने विकसित झालेला असतो. जसे की फाटलेले ओठ, टाळू, क्लबफुट, हृदय दोष इत्यादी. तसेच दुसरा प्रकार म्हणजे कार्यात्मक दोष, त्यामध्ये शरीराचा एखादा अवयव हा योग्य प्रकारे काम करत नसतो. या दोषामध्ये तंत्रिका तंत्राच्या समस्या, चयापचय संबंधी दोष यांचा समावेश होत असतो.

तसेच या दोषाचे अनेक उपप्रकार देखील पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे डिजेनेरेटिव डिसऑर्डर यामध्ये बाळ दिसायला विकसित असे दिसते परंतु ते बाळ स्वत:हून काही गोष्टी करण्यास असमर्थ असते. त्यातील अजून एक उपप्रकार म्हणजे सेंसरी डिसऑर्डर, यामध्ये बोलता न येणे, आंधळेपणा, बहिरेपणा व इतर समस्यांचा समावेश होतो. तसेच स्पेक्ट्रम विकार ज्यामध्ये बोलण्यास आणि ऐकू येण्यास समस्या उद्भवते, ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर अशा समस्या दिसतात. याव्यतिरिक्त दोषाचे सिस्टम फाइब्रोसिस आणि डाउन सिंड्रोम हे देखील अन्य दोन प्रकार पाहायला मिळतात.

जन्मदोषावरील उपाय ?
जर एखादी स्त्री गरोदरपणाची प्लानिंग करत असेल तर गर्भधारणेच्या आधी त्या स्त्रीने आपली तपासणी करून घ्यायला हवी. यामध्ये मधुमेह, वाढलेले वजन यांची तपासणी करणे महत्वाचे असते. विशेष म्हणजे गरोदारणात अल्ट्रा साउंड देखील करायला हवे. अल्ट्रा साउंड केल्याने समजते की बाळ पूर्णपणे निरोगी आहे कि नाही. काही समस्या आढळल्यास वेळीच उपचार केल्याने समस्या टळू शकते. तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्त्रियांनी लैंगिक रोगांबाबत न विसरता तपासणी केली पाहिजे.

याव्यतिरिक्त स्त्रियांनी काही टिप्सचे अनुसरण केले पाहिजे, जेणेकरून बाळात जन्मदोष निर्माण होण्याची शक्यता खूप कमी होईल. गरोदरपणात स्त्रीने लसीकरण करणे फायदेशीर ठरते. तसेच डॉक्टर नेहमी सांगत असतात की आपली औषधे ही नेहमी वेळेवरच घ्यायला हवी, त्यामुळे या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. बाळाला गर्भात असताना आवश्यक त्या गोष्टी वेळेवर मिळाल्या तर बाळ अतिशय निरोगी राहते आणि जन्मदोषाच्या धोक्यापासून ते दूरच राहील.

तसेच एका अभ्यासातून हे समोर आले आहे की स्त्रीने व्यसनमुक्त आयुष्य स्वीकारणे हे बाळासाठी अतिशय फायदेशीर ठरते. ज्या गरोदर स्त्रिया धुम्रपान, मद्यपान यांच्या आहारी जातात त्या स्त्रियांच्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात जन्मदोषाची समस्या आढळते. तसेच गरोदरपणात जितका चांगला आहार घेतला जातो तितके बाळ निरोगी राहते. कधी कधी चुकीचा आहार घेतल्याने देखील बाळामध्ये जन्मदोष निर्माण होतो. तर अशा काही गोष्टींची काळजी घेऊन गरोदर स्त्री आपल्या बाळाला जन्मदोषापासून लांब ठेऊ शकते आणि बाळाला एक चांगले व निरोगी आयुष्य प्रदान करू शकते.