Opinion Poll : बंगालमध्ये ‘फिर एक बार ममता सरकार’; आसाममध्ये कमळ ‘फुलणार’, पण दक्षिणेत ‘कोमेजणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून, पश्चिम बंगालमध्ये होणारी निवडणूक ही चुरशीची होणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत होत आहे. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

टाइम्स नाऊ-सीव्होटर्सच्या ओपिनियन पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना अगदी थोड्या फरकाने पुन्हा सत्ता काबीज करण्यात यश मिळेल, असे पोलमध्ये व्यक्त केले आहे, तर तामिळनाडूमध्ये डीएमके-काँग्रेस (DMK-Congress) युती विरुद्ध एआयएडीएमके (AIADMK) अशी चुरस पाहायला मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केरळमध्ये एलडीएफला (LDF) पुन्हा एकदा संधी मिळेल, तर आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये पुन्हा कमळ फुलण्याची चिन्हे दिसत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आल्याचे म्हटले आहे.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आलं तरी त्यांना विजयी जागांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपला यंदाच्या निवडणुकीत जास्त मतदान होईल आणि त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी 154 जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय होईल. 2016 च्या तुलनेत तृणमूल काँग्रेसला 57 जागांचा फटका बसू शकतो. 2016 च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 211 जागा मिळाल्या होत्या. 2016 च्या निवडणुकीत भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदा 107 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांना 33 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेसच्या युतीची थेट लढत एआयएडीएमके आणि भाजप युतीशी होणार आहे. डीएमके आणि काँग्रेसला 234 पैकी 158 जागा मिळतील, तर भाजपला 65 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज सर्वेक्षणात बांधण्यात आला आहे.

आसाम

आसाममध्ये 126 जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप आणि मित्र पक्षाला या निवडणुकीत 126 पैकी 67 जागा मिळतील, तर 57 जागांवर काँग्रेस आणि मित्र पक्षांना यश येईल. 2016 च्या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाला 86, तर काँग्रेस आणि मित्र पक्षाला केवळ 26 जागा जिंकता आल्या होत्या.

केरळ

केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफला पुन्हा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. 140 पैकी 82 जगा एलडीएफला मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस आणि यूडीएफला 56 जागांवर विजय मिळेल असे या सर्वेक्षणात दिसत आहे. या निवडणुकीत भाजपला मागील निवडणुकीप्रमाणे केवळ एका जागेवर समाधान मानावं लागेल.

पुद्दुचेरी

पुद्दुचेरीमधील विधानसभेच्या 30 पैकी 18 जागांवर भाजप आणि मित्र पक्षांना यश मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 12 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे.