Coronavirus : ‘कोरोना’ संदर्भात PM मोदींनी पुढाकार घेऊन सुरू केली ही मोहीम, जगातील नेत्यांनी केलं ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात एक मोठा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाला दक्षिण आशियाई देशांच्या नेत्यांनी केवळ संमतीच दिली नाही तर पंतप्रधान मोदींची स्तुती देखील केली. खरं तर पंतप्रधान मोदींनी दक्षिण आशियाई देशांतील सार्क या संघटनेत सहभागी असलेल्या देशांना आवाहन केले आहे की सर्व आठ देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनापासून बचावासाठी आणि उपाययोजनांसाठी एकत्र येऊन चर्चा करावी.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून सर्व सार्क देशांना एकत्र येऊन या विषाणूविरूद्ध लढायला सांगितले. यानंतर आता बऱ्याच देशांनी भारतीय पंतप्रधानांच्या अभियानाला पाठिंबा दर्शविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर श्रीलंका, भूतान आणि मालदीवच्या राष्ट्रप्रमुखांकडून प्रतिक्रिया आली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपति गोटाबाया राजपक्षे यांनी ट्वीट केले की कोरोना विषाणूच्या विषयावर श्रीलंका चर्चा करण्यास तयार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा वेळी नेत्रदीपक मोहीम हाती घेतली आहे, असे त्यांनी ट्विट केले. तसेच भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून लिहिले की यालाच नेतृत्व म्हटले जाते. प्रदेशाचा सदस्य म्हणून आपण एकत्र यायला हवे, अन्यथा त्याने अर्थव्यवस्थेस हानी पोहोचू शकते. मी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि ट्विटमध्ये लिहिले की कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे. प्रादेशिक ऐक्य दर्शविण्यासाठी आम्ही या मोहिमेचे समर्थन करतो. तसेच नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा पंतप्रधानांच्या या प्रस्तावावर म्हणाले की, आमचे सरकार या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहे.