राष्ट्रीय समारंभासाठी आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन नाशकात

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन – आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन नाशिकमध्ये येत असून देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये आयोजित राष्ट्रीय समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या समारंभात अमेरिकन बनावटीची होवेत्झर आणि कोरियन बनावटीची वज्र या दोन तोफा सीतारामन यांच्या हस्ते लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत. याप्रसंगी संरक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच निर्मला सीतारामन नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
यापूर्वी मे २०१६ मध्ये तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे नाशिकला आले होते. ते देवळाली, भगूर येथील कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता सीतारामन नाशिक दौऱ्यावर येत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारच्या तोफा आणि संरक्षणसामग्री उपलब्ध झाली आहे. अखेर भारताने अमेरिकेबरोबर करार करून अत्याधुनिक अल्ट्राव्हायलेट होवेत्झर आणि दक्षिण कोरियाशी करार करून वज्र अशा दोन तोफा लष्करासाठी दिल्या आहेत. या दोन्ही तोफा लष्कराला पर्यायाने देशाला समर्पित करण्याचा सोहळा स्कूल ऑफ आर्टिलरी सेंटरमध्ये होत आहे. याप्रसंगी या तोफांचे प्रात्यक्षिकही दाखविले जाणार आहे. संरक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून या समारंभात संरक्षणमंत्री उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

म. प्रदेश, छत्तीसगढमध्ये पुन्हा भाजप सरकार, एबीपी न्यूजचा सर्वे 

स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये जवानांना तोफांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या तोफा येथेच लष्कराच्या हवाली केल्या जाणार आहेत. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर या तोफा येत्या काळात तैनात होणार असून त्याद्वारे अचूक लक्ष्य भेदण्यात लष्कराला मदत होणार आहे. १९८० मध्ये भारताने स्वीडनची कंपनी बोफोर्स कडून बोफोर्स तोफांची खरेदी केली होती. ही खरेदी वादात सापडली होती. आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण गाजले. त्यानंतर भारताने लष्करासाठी तोफा खरेदी केल्या नाहीत. त्यामुळे गेल्या तीन दशकात संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.