ग्रामीण भारतात आरोग्य सेवांच्या ‘पायाभूत सुविधां’च्या विकासासाठी 10,000 कोटींच्या योजनेची झाली सुरुवात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सोमवारी 10,000 कोटी रुपयांची योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत ग्रामीण भारतामध्ये आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) सहकारी संस्थांना 10,000 कोटी रुपयांचे कर्ज देईल. या कर्जाच्या वापरामुळे आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांना मजबूत केले जाईल.

केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी सोमवारी व्हर्चुअल माध्यमातून या योजनेची सुरूवात केली. ते म्हणाले की कोरोना विषाणू साथीच्या काळात अधिक आरोग्य सुविधा निर्माण करण्याची गरज भासली आहे. ते म्हणाले, ‘राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाची योजना ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्वाचे पाऊल आहे.’

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) संदीप नायक म्हणाले, ‘सध्या भारतात सहकारी संस्थांमार्फत 52 रुग्णालयांचे संचालन केले जात आहे. या रुग्णालयांमध्ये 5,000 बेड आहेत.’ नायक म्हणाले की एनसीडीसीद्वारा कर्ज दिल्याने सहकारी संस्थांकडून पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा मजबूत होतील.

सरकारने देखील म्हटले आहे की ज्या सहकारी संस्थांच्या उपनियमांमध्ये आरोग्य सेवा संबंधित उपक्रमांसाठी योग्य तरतुदी आहेत, ते राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून कर्ज मिळवू शकतील. सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात असे म्हटले गेले आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाद्वारे प्रदान केले जाणारे हे कर्ज पात्र सहकारी संस्थांना थेट प्राप्त होईल किंवा राज्य सरकारद्वारे प्राप्त केले जाईल. अन्य स्त्रोतांकडील अनुदान परस्पर करारात्मक असेल.