जेष्ठ गायिका उषा मंगेशकर भडकल्या ‘मुंगडा’ गाण्याच्या रिमेकवर 

मुंबई : वृत्तसंस्था – आजकाल रिमिक्स च्या जमान्यात अनेक जुन्या गाण्यांना मॉर्डन संगीताचा तडका देऊन रिमेक केले जाते. असच एक गाणं ‘टोटल धमाल’ या चित्रपटात आहे.

या मल्टी स्टार कॉमेडी चित्रपटात ‘मुंगडा’ या ओरिजनल गाण्याला रिमिक्स करण्यात आलं आहे. या गाण्यावर सोनाक्षी सिन्हा  थिरकताना दिसत आहे. सोनाक्षीवर चित्रीत हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायलेल्या ‘मुंगडा’चे रिमेक व्हर्जन आहे. १९७७ मध्ये आलेल्या ‘इंकार’ या चित्रपटातील हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायले आहे. तेव्हा हे गाण हेलनजी यांच्यावर चित्रित केले होते.

सोनाक्षी सिन्हावर चित्रित केलेले हे गाणे आता वादात सापडलं आहे. गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर या गाण्याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे.

खुद्द उषा मंगेशकर यांनी देखील या रिमेक केलेल्या गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.  ‘मी पूर्णपणे  रिमिक्स व्हर्जनच्या विरोधात आहे.  सुंदर भावभावना आणि अपार कष्टांनी आम्ही ही गाणी बनवलीत. रिमिक्सच्या नावाखाली त्याचा असा बट्टयाबोळ करणे योग्य नाही,’असे उषा मंगेशकर यांनी म्हटले आहे.

‘मुंगडा’ गाण्याला संगीत देणारे राजेश रोशन यांनी देखील या रिमेक केलेल्या  गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. नव्या गाण्यात नको नको ते प्रयोग केले गेले आहेत. हे गाणे ऐकल्यावर एकच वाटते, ते म्हणजे फिल्ममेकर आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसले आहेत, असे ते म्हणाले.

याआधी अनेकवेळा  लता मंगेशकर यांनी जुन्या गाण्यांच्या रिमिक्स व्हर्जनवर नाराजी व्यक्त केली होती. गाण्यांच्या रिमिक्सचा हा ट्रेंड पाहून मला प्रचंड वेदना होतात. रिमिक्सच्या नावाखाली जुन्या अजराअमर गाण्यांच्या चाली बदलण्यात कसली आली सर्जनशीलता ? या गाण्यांच्या चाली आणि शब्द बदलण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिलेत? असा सवाल लता मंगेशकर यांनी तेव्हा केला होता.

‘टोटल धमाल’ चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर, अजय देवगण, माधुरी दीक्षित, रितेश देशमुखअसे अनेक कलाकार दिसणार आहे.