हेलिकॉप्टरमधून सीड्सबॉलद्वारे 1 लाख वृक्षबिजांचे रोपण, संभाजी महाराज प्रतिष्ठान व देवराईचा उपक्रम

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पर्यावरणपूरक देशी वृक्षांची लागण मोठ्या प्रमाणात व्हावी याकरिता धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि देवराईच्यावतीने एक लाख वृक्षबिजांचे हेलिकॉप्टरमधून सीड्सबॉलद्वारे बीजारोपण करण्यात आले. शुक्रवारी उस्मानाबाद शहरातील हातलाई ते येडेश्वरी मंदीर या परिसरातील बालाघाट डोंगररांगांवर एक लाख वृक्षबिया हेलिकॉप्टरमधून फेकण्यात आल्या. अनिल खोचरे यांनी पुढाकार घेवून सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी देखील सहभागी झाले होते.

उस्मानाबाद शहर आणि परिसरातील वनक्षेत्र वाढावे याकरिता हेलिकॉप्टरमधून सीड्सबॉलद्वारे देशी वृक्षबीजांचे रोपण करण्याची अभिनव शक्कल शुक्रवारी राबविण्यात आली. उस्मानाबाद येथील विमानतळावरून सकाळी 9 वाजल्यापासून एक लाख देशी वृक्षांच्या बियांचे चेंडू हेलिकॉप्टरमधून विविध ठिकाणी टाकण्यात आले. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून सीड्सबॉल फेकून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल खोचरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील घटत जाणार्‍या वनक्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी देवराई आणि संभाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. हेलिकॉप्टरमधून चिंच, सुबाभूळ, सीताफळ, करंज, लिंब, उंबर, पिंपळ, खैर, साग, डिकमल, कात यांसह विविध औषधी झाडांच्या बिया सीड्सबॉलच्या माध्यमातून हातलाई ते येडेश्वरी मंदीर या परिसरातील डोंगररांगांत फेकण्यात आले.

प्रसिध्द सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी देवराईच्या माध्यमातून राज्यात देशी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यांची प्रेरणा घेवून अनिल खोचरे यांनी संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षबीजांच्या माध्यमातून वनक्षेत्र संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी एक लाख देशी वृक्षांच्या बियांचे चेंडू हेलिकॉप्टरमधून डोंगराळ भागात फेकण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी 9 वाजता हेलिकॉप्टरने पहिले उड्डाण घेतले.

शासनातील प्रमुख तिन्ही अधिकार्‍यांनी गडदेवधरी, हातलाई या परिसरात योग्य जागा हेरून बियांचे चेंडू फेकले. धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एक लाख बिया डोंगराळ प्रदेशात मातीच्या हवाली केल्या आहेत. यापुढील काळातही सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवराईप्रमाणे उस्मानाबाद शहर आणि परिसरात देशी वृक्षांची लागवड करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार असल्याचे खोचरे यांनी सांगितले.

यावेळी प्रवीण कोळगे, राजेश मुंडे, प्रकाश स्वामी, प्रवीण कोकाटे, अजिंक्य पवार, जयराज खोचरे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

बालाघाट डोंगररांगांना गतवैभव मिळेल : खोचरे
उस्मानाबाद जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. मात्र मागील काही वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे निसर्ग संपत्ती अडचणीत आली आहे. त्यातच ग्लीरीसीडीया अर्थात उंदीरमारी या वृक्षाने बालाघाट डोंगररांगांना गिळंकृत केले आहे. त्यातून आपल्या परिसराची सुटका करावयाची असेल तर देशी वृक्षांची लागवड नैसर्गिकरित्या करणे, त्यातील मानवी हस्तक्षेपाला आवर घालणे आणि वनक्षेत्राचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सीनेअभिनेते सयाची शिंदे यांची देवराई आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पुढील काळातही असे सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे अनिल खोचरे यांनी सांगितले.