महापालिका उपअभियंत्यावर खंडणीचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

दरमहा १० हजार रुपयांचा हप्ता मागितला असता, तो दिला नाही म्हणून अतिक्रमण कारवाई करुन हॉटेलचालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका अतिक्रमण विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. नुकतीच महापालिकेत मारहाण झाल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पडाळे यांनी फिर्याद दाखल केली होती.

किशोर पडाळे महापालिका अतिक्रमण विभाग उपअभियंता) यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मनिष हेगडे (वय ४७, रा. भवानी सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष हेगडे यांचे गॅलक्सी सोसायटी येथे मेघदूत नावाचे हॉटेल आहे. महापालिकेया अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हेगडे यांच्या हॉटेलवर अतिक्रमण कारवाई करु नये, म्हणून त्यांच्याकडे दरमहा १० हजार रुपयांची मागणी केली. हेगडे यांनी नकार देताच त्यांनी कर्मचाऱ्याच्या मदतीने हॉटेलमधील मुख्य दरवाजाजवळ असलेले सिमेंटचे कट्ट्यावरील डीफ्रिज आणि लाकडी सर्व्हिस काऊंटरची तोडफोड केली. हॉटेलच्या आतील बाजूस असलेले स्टीलचे पावभाजी काऊंटर, २० स्टीलच्या खुर्च्या व ५ स्टीलच्या टेबलाची तोडफोड व नुकसान केले.

यांनतर हेगडे यांना हॉटेलमधून बाहेर काढले आणि त्यांना याबाबतची कोणतीही पोहोच पावती न देता हॉटेलमधील सामान घेऊन गेले. तसेच हॉटेलमधील मॅनेजर व स्टाफला शिवीगाळ करुन यापुढे हॉटेलमधील साहित्य ,सामान काढून दिले नाही तर महापालिका कायद्याप्रमाणे तुमच्यावर कारवाई करणार, अशी धमकी दिली. हेगडे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक व्ही. एस. देशमुख प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.