2 दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. १४ आणि १५ डिसेंबरला हे अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला आहे. अवघ्या दोन दिवसांचे अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभं ठाकलं आहे. अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कापूस, सोयाबीन या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसतोय, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसी समाजाची मागणी, महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सर्व प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी किमान दोन आठवड्यांसाठी अधिवेशन घ्या, अशी आमची मागणी आहे. पण ती सरकारकडून मान्य होत नाही.”

यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली असून, २ दिवसांचे अधिवेशन म्हणजे राज्यासमोर असलेल्या जनतेच्या प्रश्नांवरील चर्चेतून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

अधिवेशनावर नियंत्रण का?

सध्या राज्यात सर्वकाही सुरळीत सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त अधिवेशनावर नियंत्रण आणणे कितपत योग्य आहे, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. हिवाळी अधिवेशन नागपुरात होऊ शकत नाही. यामुळे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची मागणी भाजपकडून करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.