खासगीकरणाविरोधात कामगारांचा दोन दिवसांचा संप

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – किमान वेतन व सामाजिक सुरक्षा या मुद्यांसह खासगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी येत्या 8 व 9 जानेवारीला कामगारांचा देशव्यापी संप होणार आहे. यात नगर जिल्ह्यातील कामगार व त्यांच्या संघटनाही सहभागी होणार आहेत.

केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपशी संबंधित कामगार संघटनांना यातून वगळण्यात आले आहे. 9 रोजी शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे. विडी कामगार आयटक, इंटक, हमाल पंचायत, अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी, क्रांतिसिंह कामगार संघटना, सिटूच्या कामगार संघटना, राज्य सरकारी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पतसंस्था कर्मचारी, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट युनियन, मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह, बांधकाम कामगार, बीएसएनएल संघटना, एलआयसी अशा विविध संस्थांचे कामगार व कर्मचारी या दोन दिवसांच्या संपात सहभागी होणार आहेत.

8 रोजी दुपारी 2 ते 3 दरम्यान राज्य सरकारी कर्मचारी निदर्शने करणार आहेत. 9 रोजी दुपारी 12 वाजता गांधी मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

या आंदोलनाचे नियोजन नुकतेच हमाल पंचायतीतील बैठकीत करण्यात आले. आयटकचे अ‍ॅड. सुधीर टोकेकर, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर तसेच बाबा आरगडे, अविनाश घुले, विलास पेद्राम, अ‍ॅड. बन्सी सातपुते, शंकर न्यालपेल्ली, मधुकर केकाण, नंदू डहाणे, मेहबूब सय्यद, पी. डी. कळमकर, तसेच बाळासाहेब सुरुडे, राजेंद्र बावके, स्मिता औटी, निर्मला खोडदे, सुवर्णा थोरात, अनंत लोखंडे, आनंद वायकर आदींसह विविध कामगार संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मोर्चाचे नियोजन केले आहे.