नगरमधील त्या दोन ज्येष्ठ मित्रांचा एकाच दिवशी मृत्यू

राहुरी : पोलीसनामा आॅनलाईन  

लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांच्या सुख दुःखात नेहमी साथ दिलेल्या दोन जेष्ठ मित्रांनी एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्याने त्यांची ही मैत्री मृत्यूनंतरही अजरामर ठरणारी आहे. हनुमंता भगवंता ढोकणे (87) व रंगनाथ गेणू दुशिंग ( 90) असे या मित्रांची नावे असून उंबरे गावात एकाच दिवशी झालेला या दोस्तांचा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावून गेला.

लहानपणापासून एकमेकांना साथ देत या दोघांनी आपली मैत्री जपली. अनेकदा आलेल्या संकटावर मात केली. दोघांच्या मैत्रीबाबत उंबरे गावात नेहमीच कुतुहूल वाटत होते. अशा या दोन मित्रांनी आपापले देहत्यागही एकाच दिवशी केल्याने उंबरेकरांना अश्रू अनावर झाले.

उंबरे येथील कै. दुशिंग यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी असा परिवार असून ते उंबरे सेवा संस्थेचे सचिव राजेंद्र दुशिंग व छगन दुशिंग यांचे वडील होत. तर कै. हनुमंता ढोकणे यांच्या पश्‍चात मुलगा, दोन मुली असून ते दत्तात्रय ढोकणे यांचे वडील होते.