मिरजमध्ये दोन हजार आणि पाचशेच्या बनावट नोटा जप्त

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

मिरज शहरातील एका हॉटेलच्या बाहेर संशयितरित्या आढळून आलेल्या तरुणला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतील. अंगझडतीमध्ये त्याच्याजवळ दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या २१ बनावट नोटा सापडल्या. त्याला अटक करुन चौकशी केली असता या नोटा त्याला सातारा येथील एका व्यक्तीने दिल्या असल्याचे सांगितले. मिरज पोलिसांचे एक पथक सातारा येथील व्यक्तीच्या शोधात रवाना करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.११) रात्री आफरा हॉटेल समोरील बँकेजवळ करण्यात आली.

या प्रकरणी गौस गब्बार मोमीन (वय. 21, रा. आझाद कॉलनी, भारतनगर मिरज) याला महात्मा गांधी पोलीस चौकी पोलिसांनी अटक केली आहे. तर शुभम संजय खामकर (रा. नवीन एमआयडीसी, सातारा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी मिरज पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी  पोलीस हवालदार सुभाष पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज येथील आरफा हॉटेल समोरील बँकेजवळ गौस मोमीन हा सोमवारी रात्री उशिरा संशयितरित्या फिरत होता. याबाबत पोलिसांना त्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याला रात्रीत ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ दोन हजार रुपयांच्या चार व पाचशे रुपयांच्या २१ बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी या नोटांबद्दल त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला या नोटा सातारमधील त्याचा मित्र शुभम खामकर याने दिल्या असल्याचे सांगितले. या बनावट नोटा चलनात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पंरतु मिरज पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.

गौस मोमीन याला आज (मंगळवार) न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आहे. पुढील तपास मिरज पोलीस करीत आहेत.