रात्रीच्या संचारबंदीवर खा. उदयनराजेंचा टाेला, म्हणाले – ‘माझ्या तर बुद्धीच्या बाहेर आहे, त्यांनाच विचारा’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे, पण हे नेमके काय लॉजिक आहे ? या प्रश्‍नावर मला तर काहीच माहिती नाही. हे माझ्या बुद्धीच्या बाहेर असल्याचे सांगत ज्यांनी लागू केली त्यांनाच विचारा अशी टिप्पणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसेच कोरोनापासून बचाव करायचा असेल तर प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

खासदार उदयनराजे भोसले गुरुवारी (दि. 25) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी रात्रीच्या संचारंबदीवर विचारले असता ते म्हणाले की, यामागचे लॉजिक मला तर काही कळाले नाही, माझ्या बुद्धीच्या बाहेर असल्याचे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी गरज भासल्यास लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. यावर ते म्हणाले की, लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. हा रस्ता बंद केला आणि तो रस्ता खूला केला. तर जो रस्ता बंद केला तेथे व्हायरस नाही असे म्हणता येणार नाही. लॉकडाऊन करून काय करणार प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आता लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. परंतु व्हायरसचे स्ट्रेन बदलतात, मी तज्ञ नाही पण वाचनात आल्याचे ते म्हणाले.