परिट समाज आरक्षणसाठी मेळाव्यात समाजबांधवांचे एकमत

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील परिट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीच्या सवलती लागू होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे १९६० नंतर समाजाच्या विविध संघटनांनी वेळोवेळी पाठपुरावा चालविला; मात्र तब्बल ५७-५८ वर्ष जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेल्या या विषयाला सत्तधारी फडणवीस सरकारकडूनच न्याय मिळणार असल्याची जाणीव राज्यातील धोबी समाजाने ठेवून या सरकारशी आपण आंदोलन अथवा संघर्षाची भूमिका न घेता निरंतर पाठपुराव्याच्या आधारावर आपले आरक्षण परत पदरात पाडून घेऊ, असा संकल्प धोबी समाज आरक्षण हक्क परिषदेचे राज्य कार्यवाहक विवेक ठाकरे यांनी व्यक्त केला.

येथील जारगाव चौफुल्लीवरील जि.प.शाळेच्या आवारात धोबी समाजाचा आरक्षण संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटनावेळी ठाकरे बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक युवराज सूर्यवंशी हे होते. यावेळी समाजाचे राज्य कार्याध्यक्ष ईश्वरराव मोरे,विभागीय अध्यक्ष पंडित जगदाळे,जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे,कार्याध्यक्ष रमेश ठाकरे,राज्य परिषद सदस्य डी.एम.पाटील,युवा नेते अमोल शिंदे,प्रा.विकास सपकाळे, ॲड.रमेश माने,सचिव गोपळ सपकाळे,एल.पी.शेलोडे,भास्कर जुनागडे, जे.डी. ठाकरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या शिफारशींचा विषयाला मान्यता घेऊन लवकरच केंद्राकडे पाठवण्याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे आपल्या फाईलचा आवश्यक पाठपुरावा या सरकारमधील ना.गिरीश महाजन हे करीत आहेत. त्यामुळे आपल्याला येत्या काही दिवसात निश्चित आनंदवार्ता मिळेल, अशी माहिती ठाकरे यांनी उपस्थित समाजबांधवांना दिली.