पुण्याच्या मध्यवर्ती व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खोदकामामध्ये तोडलेली महापारेषण कंपनीच्या 132 केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. 7) पहाटे पावणेदोन वाजता पूर्ण झाल्यानंतर पर्यायी व्यवस्थेतून सुरु असणारा पुणे शहरातील मध्यवर्ती व परिसराचा वीजपुरवठा आज मूळ वीजवाहिन्यांवरून पूर्ववत करण्यात आला.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात पुणे महानगरपालिकेकडून सुरु असलेल्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्यामुळे शनिवारी (दि. 2) सकाळी 11.33 पासून रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला होता. या उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या महावितरणच्या 6 उपकेंद्राचाही वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये पर्वती, बंडगार्डन, शिवाजीनगर, पद्मावती व रास्तापेठ विभाग अंतर्गत पुणे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, गंज पेठ आदी सर्व पेठा तसेच लक्ष्मी रोड, गुलटेकडी, लुल्लानगर, कॅम्प, मंडईचा काही भाग, हाईडपार्क, स्वारगेट, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, सिंहगड रोड आदी परिसरात वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र महावितरणकडून या परिसरातील सुमारे 2 लाख वीजग्राहकांसाठी इतर उपकेंद्रांद्वारे 75 ते 80 मेगावॉट विजेचे यशस्वी भारव्यवस्थापन करून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला.

महापारेषणकडून 132 केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी चेन्नई येथून तज्ञ कर्मचारी व वाहिनी जोडण्यासाठी जॉईंट मागविले होते. गेले पाच दिवस दुरुस्ती काम सुरु होते व गुरुवारी (दि. 7) पहाटे पावणेदोन वाजता वीजवाहिनीला 4 जॉईंट लावल्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. यासाठी सुमारे 40 लाख रुपयांचा खर्च आल्याची माहिती महापारेषणकडून देण्यात आली. आज पहाटेच महापारेषणकडून रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले.

त्यानंतर महावितरणकडून सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा या 132 केव्ही उपकेंद्रातून सुरु करण्यात आला व सकाळच्या सुमारास पुणे शहराचा मध्यवर्ती भाग व परिसरातील वीजपुरवठा मूळ वीजवाहिन्यांवरून पूर्ववत करण्यात आला. गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत वीजग्राहकांनी केलेल्या सहकार्याबद्दल महावितरणने आभार मानले आहे.

ह्या हि बातम्या वाचा

वाह रे पालकमंत्री ; ‘त्या’ अहवाल प्रकाशनानंतर गिरीश बापट सोशल मीडियावर ट्रोल

अकरावी प्रवेशासाठी इन-हाऊस कोटा आता १० टक्के

जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यामागे हिजबुल मुजाहीद्दीनचा हात