दुर्दैवी ! सांगलीत शाळेचं गेट अंगावर पडल्यानं 5 वर्षांच्या बालकाचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे गेट अंगावर पडल्याने 5 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. वेदांत मनोज कारंडे असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी जेवणाच्या सुट्टी वेळी ही घटना घडली.

वेदांत नागेवाडी येथील अंगणवाडीत शिकत होता. आज दुपारी तो शाळेच्या मैदानात खेळत होता. यावेळी हातातील बॉल गेटच्या दिशेने गेल्यामुळे तो बॉल आणण्यासाठी गेटकडे गेला. यावेळी शाळेचे लोखंडी गेट वेदांतच्या अंगावर कोसळले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. या घटनेची माहिती मिळताच शाळेत बैठकीसाठी आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र निकम यांनी शिक्षकांच्या मदतीने वेदांतला उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु, डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या वेदांतचा वाटेतच मृत्यू झाला.

शाळा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याने पालक संतप्त बनले आहेत. वर्षांपूर्वीच उभारलेले लोखंडी गेट कोसळून ही घटना घडल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.