दुर्दैवी ! मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जामनेर तालुक्यातील गारखेडा गावात ही दुर्दैवी घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. उत्तम श्रवण चौधरी (वय-47) आणि वैशाली उत्तम चौधरी (वय-44) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम चौधरी आणि त्यांच्या पत्नी वैशाली हे घरात झोपले असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग लागली. त्यावेळी भुसावळ जामनेर रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रक चालकाला घरातून धूर येत असल्याचे दिसून आले. त्याने या घटनेची माहिती तातडीने गावातील लोकांना दिली. गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

गावकऱ्यांनी घरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे ग्रामस्थांना घरात प्रवेश करता आला नाही. अखेर ग्रामस्थांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. घरातील वेदनादायी चित्र पाहून सर्वांचेच मन हेलावले. चौधरी दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला. चौधरी दाम्पत्याला एक विवाहीत मुलगी आणि एक मुलगा आहे.