Budget 2021 : देशात 100 सैनिकी शाळा, लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या काळात आज तिसऱ्यांदा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये शिक्षणासाठी भरघोस तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाला हृदयापासून स्वीकार करण्यात आलं आहे. या अंतर्गत 100 नव्या सैनिकी शाळा उभारल्या जातील. यासाठी खासगी क्षेत्राचीही मदत घेतली जाईल. तसेच उच्च शिक्षण आयोग स्थापन केलं जाईल. यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरच्या लेह भागात केंद्रीय विद्यापिठाची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी वेगळी तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत 15 हजार शाळांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्यात येईल. तसेच उच्च शिक्षण यंत्रणा आणखीन भरभक्कम बनवण्यासाठी कायदे तयार करण्यात येतील. राष्ट्रीय भाषा भाषांतर मिशन अंतर्गत भारतातील प्रमुख भाषांमध्ये इंटरनेटवर माहिती उपलब्ध होईल, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

पीएसएलव्ही सी 51 लॉन्चिंग करण्यासाठीचे काम सुरु आहे. गगनयान योजनेंतर्गत चार भारतीय अंतराळवीरांचे रशियामध्ये प्रशिक्षण चालू आहे. 2021 मध्ये मानवरहीत गगनयान मोहिम सुरु होईल, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.