Pune News : चांदणी चौकातील कामाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  मागील काही दिवसांपासून चांदणी चौकातील प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पालिकेनं केल्यामुळं 2 मजली उड्डाणपूलाच्या बांधकामाला वेग आला आहे. आज (शनिवार, दि 13 फेब्रुवारी) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याची पाहणी केली.

चांदणी चौक, कोथरूड, वारजे, बाणेरसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चांदणी चौकात दोन जमली उड्डाणपूलाचं बांधकाम करण्यात येणार आहे. चांदणी चौकातून मुंबई, सातारा, मुळशी आणि कोथरूडकडे जाता येईल अशी या पुलांची रचना करण्यात आली आहे.

27 ऑगस्ट 2017 रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. या पुलासाठी 13.92 हेक्टर जमीनीच्या भूसंपादनासह काही बंगले ताब्यात घेतले जाणार होते. परंतु भूसंपादनाअभावी या उड्डाणपुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं आहे.

तत्कालीन महापालिका आयुक्त आणि विद्यमान विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यावेळी राज्य सरकारनं महापालिकेला आर्थिक मदत जाहीर केली होती. यानंतर महापालिकेनं समिती नियुक्त करून भूसंपादनाचं काम सुरू केलं आहे.