हातभट्टीच्या दारूत गंधक आणि युरिया, पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या ५ भट्ट्या

जालना : पोलीसनामा आॅनलाइन – जास्त नशा यावी म्हणून हातभट्टीमध्ये युरिया, गंधकसह धोकादायक रसायने मिसळून गावठी दारू बनविणाऱ्या पाच हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. कैकाडी मोहल्ला परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शाखेच्या पथकाकडून वारंवार कारवाई करूनही स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे कैकाडी मोहल्ला परिसरात गावठी हातभट्ट्या सर्रास सुरू आहेत.

हातभट्टी चालविणारे सडलेला गूळ, गंधक, युरिया यासारखे मानवी आरोग्यास घातक विषारी पदार्थांचे रसायन गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी वापरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. यानंतर गौर यांनी  पथकासह कैकाडी मोहल्ल्यात छापा टाकला. हातभट्टी दारू तयार करण्यासाठी सुरू असलेल्या पाच हातभट्ट्यांसह चार ठिकाणी घरातच दारू तयार केली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.

गुन्हे शाखेच्या पथकाने हातभट्ट्या उद्ध्वस्त करून दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी रसायन नष्ट केले. डड्ढम व अन्य साहित्य जप्त केले. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहायक उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, सदाशिव राठोड, हिरामण फलटणकर, किशोर जाधव, गणेश वाघ, मंदा बनसोडे यांनी ही कारवाई केली.