अमेरिकेचा संसदेत भारताला पाठिंब्याचा ठराव, चीनचा निषेध

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लडाखमध्ये भारताने चीनविरोधात दाखवलेल्या आक्रमकतेचे अमेरिकेने कौतुक केले आहे. अमेरिकेतील संसदेत दोन शक्तिशाली सिनेटर्स ग्रुपकडून चीनच्या आक्रमकतेचा निषेध करणारा ठराव सादर करण्यात आला. चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा उल्लेख ठरावात करण्यात आला आहे.

चिनी सैन्यांकडून भारतीय सैन्यांविरोधात घेतली जाणारी भूमिका, लष्कर पाठवण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुहमत असणार्‍या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन कोर्निन आणि सिनेटच्या गुप्तचर निवड समितीचे सदस्य मार्क वॉर्नर यांनी हा ठराव सादर केला. सिनेट इंडिया कॉकसचा सह-संस्थापक या नात्याने भारत आणि अमेरिकेमधील दृढ संबंध किती महत्त्वाचे आहेत याची मला जाणीव आहे, असे जॉन कोर्निन यांनी सांगितले.

मी चिनविरोधात भूमिका घेण्यासह इंडो-पॅसिफिक क्षेत्र स्वतंत्र राहण्यासाठी भारताने दाखवलेल्या कटिबद्धतेची प्रशंसा करतो, असेही ते म्हणाले आहेत. गलवान खोर्‍यात नियंत्रण रेषेवर भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. चीनचे जवानही यामध्ये ठार झाले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मार्क वॉर्नर यांनी वादग्रस्त ठिकाणी चीनकडून चिथावणी देणार्‍या गोष्टी करण्यात आल्या असल्याचे म्हटले आहे. चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात आला असून हा ठराव त्याचा निषेध करतो असेही मार्क वॉर्नर यांनी सांगितले आहे .