खळबळजनक ! UP मध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, दोघांना अटक

गोरखपूर : वृत्तसंस्था – भाजप नेते आणि निवडणुकीच्या तयारीत असलेले माजी सरपंच बृजेश सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील नारायणपूर गावात शुक्रवारी (दि. 2) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गेल्या आठ दिवसांत हत्येच्या 7 घटना घडल्याने गोरखपूरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सुनील श्रीवास्तव आणि रामसमुझ या दोघांना अटक केली आहे. तर अन्य आरोपीचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बृजेश सिंह नारायणपूरचे माजी सरपंच आणि भाजपचे सेक्टर प्रभारी होते. यावेळी ते सरपंचपदाचे प्रमुख दावेदार होते.

सिंह हे नारायणपूर गावातील प्रचार उरकून रात्री अकरा वाजता गोरखपूरला आपल्या निवासस्थानी जात होते. त्याचदरम्यान गावाबाहेर दबा धरून बसलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक पोहोचले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वीच जमिनीवरून प्रॉपर्टी डीलरसोबत वाद झाला होता. त्यामुळे त्या दिशेनेही तपास सुरू आहे.