लासलगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेच्या विविध समस्यांना वैतागुन पाणीपुरवठा सचिवाचा तडकाफडकी राजीनामा

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेच्या रोजच्या विविध समस्यांना वैतागून पुरवठा विभागाचे सचिव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शरद पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सदर माहिती सचिव शरद पाटील यांनी दिली.

लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पदभार सचिव शरद पाटील यांच्याकडे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आला होता. या योजनेत काम करत असताना त्यांनी लासलगांव, विंचुर सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन अतिशय कुचकामी झाली असून रोज नवीन नवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे गावातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे लासल करांना पाणीपुरवठा करणे जिकरीचे झाले आहे.

या योजनेचे लाभार्थी असलेले लासलगाव विंचूर सह कोटमगाव, टाकळी, ब्राह्मणगाव पिंपळगाव नजीक, निमगाव वाकडा यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे परंतु विंचुर ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असताना देखील यांच्याकडून पाणीपट्टी थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे तसेच या योजनेवर मोठ्या प्रमाणात थकलेले वीज बिल मोठी डोकेदुखी आहे त्यामुळे लाईट बिल, कर्मचारी वेतन, पाईपलाईन लिकेज दुरुस्ती, पंप दुरुस्ती यावर खर्च करताना वसुली होत नसल्याने ही योजना चालवणे अवघड झाले आहे.

या योजनेचा लासलगाव ग्रामपंचायती चा काडीमात्र संबंध नसताना वरिष्ठांच्या आदेशानुसार हे सचिव पद माझ्याकडे दिले गेले होते. या योजनेवर काम करण्यास ग्रामपंचायत कर्मचारी नाखूष असतात त्यामुळे त्यांच्या सहकार्याशिवाय मी हे काम करू शकत नाही या अतिरिक्त कामामुळे माझे लासलगाव ग्रामपंचायतती कडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या लाभार्थी गावांच्या अन्य ग्रामसेवका कडे सदर पदभार देण्यात यावा अशी विनंती त्यांनी पाठवलेल्या राजीनाम्यात केली आहे.