छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात वाजपेयींची पुतणी लढणार

रायपूर:  वृत्तसंस्ठा छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरुद्ध दिवंगत माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी या उभ्या ठाकल्या असून या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. छत्तीसगडमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापले आहे.

मुख्यमंत्री रमण सिंह आज राजनांदगावमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तेथून ते 2008 पासून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसकडून यावेळी त्यांच्या विरोधात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने हे कडवे आव्हान उभे केले आहे.  शुक्ला देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

करुणा शुक्ला १४ व्या लोकसभा निवडणुकीत जांजगीरमधून निवडून आल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावरून दूर झाल्यानंतर भाजपकडून शुक्ला यांना वारंवार डावलले गेल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रमण सिंह सरकारच्या विरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवल्याने त्यांना काँग्रेसने रमण सिहांच्याच विरोधात उमेदवारी दिली आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

९० सदस्यीय छत्तीसगड विधानसभेसाठी नक्षलग्रस्त भागातील १८ जागांसाठी पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ७२ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४९ तर काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवला होता. छत्तीसगडसह मध्यप्रदेश, राजस्थान या तीनही राज्यातील निवडणुकांत भाजपचा पराभव होऊ शकतो, असा निवडणूकपूर्व सर्व्ह आला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांवरच भाजपची मदार असणार आहे़ त्यात काँग्रेसने थेट मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपसह सर्वांमध्ये आदरणीय स्थान असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणीलाच रिंगणात उतरविल्याने ही लढत मोठी चुरशीची होणार असल्याचे मत आतापासूनच व्यक्त केली जाऊ लागली आहे.

जाहिरात