व्हैलेंटाईन-डे प्रेम विरांसाठी महागला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

मी दिलेला गुलाब तु….
अजूनही जपुन ठेवलेस….
माझ्या वरचे प्रेम देखील…
मनात दडवून ठेवलेस….

प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबाला व्हैलेंटाईन-डे च्या निमित्ताने मागणी वाढली आहे. प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी लाल रंगाच्या गुलाबाला महत्त्वाचे स्थान आहे. उद्या (१४ फेब्रुवारी) व्हैलेंटाईन-डे जगभरात साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लाल रंगाच्या गुलाबांना मागणी वाढली आहे. पुण्यातील फुलांच्या घाऊक बाजारात बुधवारी गुलाबाची चांगली आवक झाली. वीस गुलाबांच्या गडीला २०० ते २२० रुपये इतका भाव मिळाला. पुण्याच्या बाजारात मावळ, शिरूर तालुका, तळेगाव ढमढेरे आदी भागातून गुलाबाची आवक झाली. या भागात फूल उत्पादक शेतकरी पॉली हाउस उभे करून गुलाबांचे उत्पादन घेतात. त्यामुळे या भागातून दर्जेदार गुलाबांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. व्यापारी सागर भोसले याबाबत म्हणाले, “गुलाबाचे विविध प्रकार असून यामध्ये टॉप सिक्रेट या प्रकारच्या गुलाबाला अधिक मागणी असते.

हा गुलाब दिसण्यास सुंदर असतो. त्याच्या पाकळ्यांचा हार देखील करता येतो. त्याचप्रमाणे ‘फर्स्ट रेड’, ‘ग्रंड काला ‘असे लाल गुलाबाचे प्रकार आहे. पिवळा रंगाच्या गुलाबाला लाल रंगाच्या तुलनेत मागणी कमी आहे. गुलाबी, पांढरा या रंगाचे गुलाब विक्री उपलब्ध झालेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थंडी अधिक काळ राहिल्यामुळे गुलाबाचे उत्पादन तुलनेत कमी राहिले. यामुळे मागणी आणि पुरवठा समान राहिला. याचा परिणाम गुलाबाला चांगला भाव मिळाला. पुण्यातून आणि पश्‍चिम महाराष्ट्रातुन गुलाबाची निर्यात केली जाते. निर्यातीची मागणी थांबली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात देखील गुलाबाची चांगली आवक झाली.”