सांगलीतील ‘हायफाय’ ऑफिसर्स क्लबमध्ये तोडफोड

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात असणाऱ्या वरीष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासह नामवंत सदस्य असणाऱ्या ऑफिसर्स क्लबमध्ये तोडफोड करण्यात आली. बिल देण्यावरून ही घटना घडली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सगळे वरिष्ठ अधिकारी या क्लबचे पदाधिकारी तसेच सदस्य आहेत. यामध्ये क्लबचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी व्यवस्थापनाने सांगली शहर पोलिसांमध्ये ९ जणांविरोधात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून ९ जणांवर गुन्हा दाखल करत ९ जणांना अटक केली आहे. रविवारी ९ उच्च भ्रू व्यक्ती आमराई येथील ऑफिसर क्लबमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर जेवणाच्या बिलावरून हॉटेल व्यवस्थापनाशी त्यांचा वाद झाला. यावेळी त्यांनी हॉटेलच्या दोघा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्या ९ जणांनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली आणि ते निघून गेले.

तोडफोड प्रकरणी अवधूत शेळके, अच्युत शेळके, सुरज शरनाथे, सुरज कुंभार, सुरज शहा, प्रदीप टिळे, प्रवीण जाधव, सात्विक शहा, वैभव सुरेश खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आमराई क्लबचे सहाय्यक व्यवस्थापक अमोल काशीद यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.