PM मोदींच्या मतदारसंघातच ‘कोरोना’ लसीकरणाच्या तयारीचा फज्जा, ड्राय रनमध्ये चक्क सायकलवरून पोहचवली लस

वाराणसी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनावरील लशींच्या आपत्कालीन वापरास मान्यता मिळाल्यापासून दहा दिवसांत देशात लसीकरण (Corona Vaccination) मोहीम सुरू करण्यास सज्ज असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले. आरोग्य मंत्रालयाने लसीकरणादरम्यान (Corona Vaccination) कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि त्यामध्ये असणारे दोष दूर करता यावेत यासाठी ड्राय रन घेण्यात आल्या होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्ये कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) तयारीची पोलखोल झाल्याचे पहायला मिळालं. ड्राय रनदरम्यान आरोग्य कर्मचारी चक्क सायकलवरुन कोरोनाची लस घेऊन रुग्णालयात दाखल झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पुढील आठवडय़ात लसीकरण मोहीम सुरू होण्याचे संकेत असून, याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकार लवकरच जाहीर करणे अपेक्षित असतानाच हा प्रकार समोर आल्याने उत्तर प्रदेश सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आरोग्य मंत्रालयाने याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लसीकरण सराव फेरी म्हणजेच ड्राय रन घेतली. ही ड्राय रन यशस्वी झाल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. लसीकरणादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि त्यामध्ये असणारे दोष दूर करता यावेत यासाठी ड्राय रन घेण्यात आल्या होत्या.

वाराणसीमधील चौकाघाट करोना लसीकरण केंद्र असणाऱ्या महिला रुग्णालयात चक्क सायकलवरुन लस पोहचवण्यात आली. विशेष म्हणजे ही लस रुग्णालयात पोहचली तेव्हा तेथेही कोणतीच तयारी करण्यात आली नसल्याचे दिसून आलं. करोनाची लस केंद्रापर्यंत पोहचवताना ती योग्य तापमानात राहील, ती केंद्रापर्यंत कशी पोहचलवी जावी यासाठी काय खबरदारी घ्यावी याचा सराव या ड्राय रनमधून होणं अपेक्षित होतं. मात्र त्या उलट चक्क सायकलवरुन लस केंद्रावर पोहचवण्यात आल्याने उत्तर प्रदेश सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

वाराणसीचे मुख्य आरोग्य अधिकारी असणाऱ्या डॉ. व्ही. बी. सिंह यांनी सायकलवरुन लस पोहचवण्यात आल्याचं मान्य केलं आहे. पाच केंद्रांवर व्हॅनने लस पोहचवण्यात आली. केवळ महिला रुग्णालयामध्ये सायकल कॅरियरच्या माध्यमातून लस पोहचवल्याचं त्यांनी सांगितलं.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी लसीकरणासंदर्भातील ड्राय रनचे नियोजन करण्यात आलं होत. मात्र, नियोजनाभावी उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरणासंदर्भातील पूर्वतयारीचा फज्जा उडल्याचे चित्र दिसत असल्याचे म्हंटल आहे.

ड्राय रनसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्देश दिलेले असतानाही यासाठीचे योग्य नियोजन न झाल्याचे चित्र दिसून आलं. अनेक केंद्रांवर स्वयंसेवकच उपस्थित नव्हते. काही ठिकाणी २५ लोकांच्या लसीकरणाचा सराव करण्याचं ठरवण्यात आलं होतं तिथे केवळ दोनजण लस टोचून घेण्यासाठी पोहचल्याचे चित्र दिसले. ५ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये सर्वात मोठी ड्राय रन घेण्यात आली. मुख्यमंत्री आदित्यनाथ हे लखनऊमधील लोहिया संस्थानमध्ये ड्राय रनची माहिती घेण्यासाठी पोहचले होते.