Coronavirus : दुबईतून भारतात आल्यानंतर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आसलेल्यानं केला दिल्ली-वाराणसी ‘रेल्वे’नं प्रवास, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्रीय आरोग्य विभागाने दुबईहून येणार्‍या लोकांकडे सुरुवातीला केलेले दुर्लक्ष व त्यांच्या बंदी असलेल्या देशात समावेश उशीरा केल्याचा मोठा फटका देशाला बसत आहे. महाराष्ट्रात मुंबई विमानतळावरुन तसेच बाहेर पडलेल्या दुबईहून आलेल्यांनी राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार केला आहे. हीच स्थिती दिल्ली विमानतळावर दिसून येत आहे.

दुबईहून दिल्लीत आलेला व तेथून वाराणसीला रेल्वेने गेलेला ३० वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना विमानतळावर तपासणीत त्यांना सविस्तर माहिती दिली जात नसल्याचे पुढे आले आहे. वाराणसीचा हा ३० वर्षाचा तरुण १७ मार्चला दुबईहून विमाने दिल्लीला पोहचला आणि १८ मार्चला तो रेल्वेने वाराणसीला आहे. तसेच टेम्पोमधून आपल्या गावी गेला. घशाला त्रास होत असल्याने तो १९ मार्चला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात तपासणी करण्याकरिता गेला होता. तेथे त्याची तपासणी करण्यात आल्यावर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आला. त्याला आता दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

या तरुणाने रेल्वेतून प्रवास केला आहे. रेल्वेमध्ये तो किती जणांच्या संपर्कात आला. हे सांगणे कठीण आहे. तसेच वाराणसीतून तो टेम्पोने गावी गेला होता. या टेम्पोत तो किती लोकांच्या संपर्कात आला याची काहीही माहिती मिळू शकलेली नाही. या तरुणामुळे आता त्याने कोरोनाचे संक्रमण सामान्य लोकांपर्यंत किती पसरविला असेल, याची काहीही माहिती पुढे आलेली नाही. या संपूर्ण प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.