दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला परीक्षेसाठी मिळणार ऑनलाइन प्रश्नसंच

मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देशभरात मोठे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसला होता. त्यातच हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न अधोरेखित झाला. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले नाहीत. पण अशा विद्यार्थ्यांची चिंता आता मिटणार आहे. कारण परीक्षेसाठी ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध केले जाणार आहेत.

कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्वच शाळा 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामध्ये दहावी-बारावीच्या वर्गाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच दहावी-बारावी परीक्षा येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. त्यावरून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले, की कोरोनाची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचे अधिकार त्या-त्या स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइनच घेतली जाणार आहे.

दरम्यान, दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइनच घेतली जाणार असून, या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सराव करता यावा, यासाठी एससीईआरटीकडून प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.