वर्षा राऊत यांना पुन्हा ED चे समन्स; 11 जानेवारीला होणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाीन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena Mp Sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ED ने पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. ED ने वर्षा राऊत (Varsha Raut) यांना 11 जानेवारीला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहावे आदेश दिले आहेत. 4 जानेवारी रोजी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची चौकशी पुर्ण झाली नसल्याचे सांगत त्यांना ED ने पुन्हा एकदा समन्स बजावल्याचे समजते.

प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे चौकशीसाठी ED ने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी नोटिस बजावली होती. मात्र, राऊत यांनी ईडीकडे पत्र सादर करत चौकशीसाठी मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर ईडीने त्यांना 5 जानेवारी रोजी नव्याने समन्स बजावले होते. वर्षा राऊत त्याआधीच म्हणजे 4 जानेवारीला ED कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. परंतु, त्यावेळी चौकशी पूर्ण न झाल्यामुळे ईडीने पुन्हा एकदा वर्षा राऊत यांना समन्स बजावले असल्याचे समोर आले आहे.

ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या तपासासंबधित वर्षा राऊत यांची सुमारे चार तास चौकशी केली आहे. प्रवीण राऊत यांनी कर्ज म्हणून दिलेले 55 लाख रुपये नेमके कशासाठी घेण्यात आले? तसेच ते व्याजमुक्त कर्ज कशासाठी होते?, हा व्यवहार कसा होता? आदी प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याखेरीज वर्षा राऊत यांचे आणखीही काही आर्थिक संबंध आहेत का?, याचीही ईडीकडून माहिती काढली जात आहे.