‘या’ खेळाडूची एक चूक IPL 2021 ला महागात पडणार, तरीही खेळला होता दिल्लीविरुद्धचा सामना ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दररोज साडेतीन लाखांच्या आसपास रुग्ण सापडत आहे. देशात कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलच्या प्रत्येक लढतीमध्ये रंगत येत असून आयपीएलने आपल्या खेळाडूंसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, सपोर्ट स्टाफ यांच्या सुरक्षेसाठी स्वत:चे बायो बबल तयार केले आहे. मात्र सोमवारी या बायो बबलवर कोरोनाचा स्ट्राईक झाला.

आजचा RCB विरुद्धचा सामना रद्द

केकेआरच्या संघातील दोन खेळाडूंना कोरोना झाला. यामध्ये फिरकीपटू वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर या दोघांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांपैकी वरुण हा या बायो बबलच्या बाहेर गेला होता. वरुणला दुखापत झाली होती. या दुखापीची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्याचवेळी त्याने आयपीएलचे बायो बबल सोडले होते. केकेआरच्या दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आजचा RCB विरुद्ध होणारा सामना रद्द करावा लागला.

CSK च्या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

केकेआरच्या दोन खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) CEO कासी विश्वनाथन, गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व बस क्लिनर यांचा देखील कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कोटला मैदानावर आयपीएलचे सामने होत आहेत. याच स्टेडियमवर काम करणाऱ्या पाच ग्राऊंड्समनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे.

खेळाडूंची धाकधूक वाढली

CSKचे सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. पण चक्रवर्थीच्या एका चुकीमुळे केकेआर संघासह दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंची धाकधूक वाढवली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, वरुण खांद्याच्या स्कॅनसाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये गेला होता. मात्र हॉस्पिटलमधून परतल्यानंतर तो क्वारंटाईनमध्ये गेला नाही आणि दुसऱ्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळला.

तरच 7 मे चा सामना होणार

केकेआरने त्यांच्या सर्व खेळाडू व स्टाफ सदस्यांना 6 मे पर्यंत क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. त्यांची दररोज टेस्ट केली जाणार असून जर रिपोर्ट निगेटिव्ह आले तरच 7 मे रोजी RCB विरुद्धचा सामना खेळवला जाईल, असेही वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

ग्रीन चॅनेल म्हणजे काय ?

आयपीएलच्या ग्रीन चॅनेल नियमानुसार खेळाडूला उपचार पाहिजे असतील किंवा त्याच्या दुखापतीचे स्कॅन करायचे असेल तर त्या खेळाडूला एका गाडीतून (बायो बबलमध्ये असलेल्या चालकासह), पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये नेले जाते. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी देखील पीपीई किट घालूनच त्या खेळाडूवर उपचार करतात. उपचार झाल्यानंतर खेळाडू त्याच गाडीतून पुन्हा बायो बबलमध्ये परत येतो.