रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला वाहनाची जबर धडक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जुन्‍नर तालुक्यातील ओतूर गावाजवळ कल्याण-नगर महामार्गाचा रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यामुळे बिबट्या गंभीर जखमी झाला असुन त्याच्या दोन्ही पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.

कल्याण-नगर महामार्गावरील अहिंनवेवाडी फाट्याजवळ घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ खोळंबली होती. घटना घडल्यानंतर बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओतूर विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी बापू येळेआणि वन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी झालेल्या बिबटयाला ताब्यात घेवुन जुन्‍नर येथील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात त्याची रवानगी केली.

बिबटयावर उपचार चालु असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भरधाव वाहनाने धडक दिल्यानंतर बिबट्या गंभीर जखमी झाल्याचे व्हिडिओ चित्रीकरण काही नागरिकांनी केले असुन ते समाज माध्यमांवर व्हाययर होत आहे.