Pune News : टेकडीवर जाॅगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या

पोलिसनामा ऑनलाईन – अनोळखी व्यक्तींनी चतुःशृंगी टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरीकांची पाषाण रस्त्यावर उभी केलेली नऊ वाहने फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना रविवारी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत नागरीकांच्या वाहनांचे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४७ वर्षीय व्यावसायिकाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी देखील या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पोलिस संशोधन केंद्र ते अभिमान श्री सोसायटी दरम्यान रस्त्यावर वाहने पार्क केली होती. चतुःश्रुंगी टेकडीवर सकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक त्यांच्या कार या पाषाण रस्त्यावर पार्क करतात. सकाळी सहा ते सव्वा सातच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या कारच्या काचा फोडल्या. फिर्यादीच्या कारची काच फोडून सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल, रोख रक्कम असा २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादीप्रमाणेच इतर नऊ कारच्या काचा फोडून ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. टेकडीवर फिरून आल्यानंतर नागरिकांना त्यांच्या कारच्या काचा फोडल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या कारमधील मोबाईल व इतर ऐवज चोरून नेल्याचेही निदर्शनास आले.