अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने आज (शनिवार) पुण्यात निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. 6 नोव्हेंबर 1929 रोजी किर्लोस्करवाडी येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे, प्रिया मराठे असा परिवार आहे.

मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत झाले. बीएस्सीसाठी ते पुण्यात स.प. कॉलेजात गेले. मुंबईत शिकत असताना ते नाट्य अभिनयाकडे वळले. श्रीकांत मोघे यांनी 60 हून अधिक नटकांमध्ये आणि 50 हून अधिक सिनेमांत काम केले आहे. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे.

श्रीकांत मोघे यांनी वाऱ्यावरची वरात आणि साक्षीदार ही दोन नाटके दिगर्शित केली आहेत. तसेच ते दूरचित्रवाणी मालिकांमधून घराघरात पोहचले. दूरचित्रवाणीवरील अजून चांदरात आहे, अवंतिका, उंच माझा झोका, भोलाराम, स्वामी इत्यादी मालिका गाजल्या. श्रीकांत मोघे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार, लोक कल्याण प्रतिष्ठान पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.