Out की Not Out ? दोघांनी मिळून पकडला ‘झेल’ ! (व्हिडीओ)

मेलबर्न : वृत्तसंस्था – क्रिकेट सामन्यादरम्यान कठीण झेल घेताना खेळाडूंना पाहिले असेल. जो झेल होऊ शकत नाही असा आपण विचार करतो पण खेळाडू आपल्या कौशल्याने हा झेल घेतो. असाच एक झेल ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे पहायला मिळाला. या ठिकाणी सध्या ‘बिग बॅश लीग स्पर्धा’ सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंसह इतर देशातील खेळाडू देखील खेळत आहेत. या स्पर्धेत दोन दिवसांपूर्वी 24 तासात अफगाणिस्तानच्या रशिद खान आणि पाकिस्तानच्या हारिस राऊफने हॅटट्रिक घेतली. स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात एका झेलमुळे वाद झाला.

ब्रिस्बेन विरुद्धच्या या सामन्यात होबार्ट हरिकेन्स संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड याचा कॅच दोन फिल्डरांनी मिळून पकडला. आता अशा प्रकारे घेतलेला कॅच नियमात बसतो का यावरून वाद सुरु झाला आहे. अंपायरने हा कॅच बरोबर असल्याचे ठरवत फलंदाजाला बाद ठरवले. सामन्यात होबार्टचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. 14 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर वेडने लॉन्ग ऑनवर हवेत चेंडू मारला.

वेडने मारलेल्या फटक्यावर उडालेला झेल ब्रिस्बेनच्या मॅट रेनशॉने हवेत उडी घेत चेंडू पकडला. मात्र, झेल घेताना त्याला त्याचा तोल सांभाळता आला नाही. मॅटचा पाय सीमा रेषेच्या बाहेर पडण्याआधी त्याने पकडलेला चेंडू पुन्हा हवेत उडवला. त्याचवेळी सीमा रेषेवर उभा असलेल्या टॉम बॅटने याने तो चेंडू झेलला. फलंदाज आऊट आहे की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अखेर सीमा रेषेवर नेमके काय घडले हे पाहण्यासाठी तिसऱ्या अंपायरची मदत घेण्यात आली. बराच वेळ रिप्ले करुन व्हिडीओ पाहण्यात आला. अखेर वेडला बाद ठरवण्यात आले.

यावर बोलताना वेड म्हणाला, क्रिकेटमधील अशा नियमांबद्दल मला माहित नव्हतं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर केल्यानंतर त्याला अडवण्याची परवानगी आहे की नाही याची कल्पना नाही. तो अंपायर्सचा निर्णय आहे. चेंडू सीमा बाहेर पडण्याआधी हवेतून आत टाकल्यानंतर जर झेल घेतला तर फलंदाज बाद होऊ शकतो, हे मला समजल्यानंतर अंपायरचा निर्णय योग्य होता असेच म्हणावे लागेल. सीमा रेषेवर हवेत उडी मारून झेल घेतला तर फलंदाज बाद होतो. हा बदल 2017 मध्ये करण्यात आला होता. नियम 19.5 नुसार हा कॅच योग्य असल्याचे मेलबर्न क्रिकेट क्लबने ट्विट करुन सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/