विजय मल्ल्याचा मुक्काम लवकरच आर्थर रोड कारागृहात

मुंबई : पोलीसनामा

देशातील बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या विजय मल्ल्याने आर्थर रोड कारागृहात योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. यानंतर सीबीआयने लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ सादर केला. आठ मिनिटांच्या या व्हिडीओत विजय मल्ल्याचे दावे खोटे ठरले आहेत. मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार केली होती. यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स कोर्टाच्या न्यायाधीश एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिल्यानंतर हा व्हिडीओ सादर करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fb0ccc60-a82b-11e8-9cb2-9d375b1546cd’]

आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये सुर्यप्रकाश येण्यासाठी मुबलक जागा असून तिथे आराम करण्याचीही व्यवस्था आहे. यासोबतच बराकमध्ये खासगी शौचालय, टीव्ही आहे, हे व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे. मल्ल्याला रोज स्वच्छ चादरी आणि उशा दिल्या जाणार आहेत.

बराकमध्ये पूर्व दिशेला खिडकी असून तेथून सुर्यप्रकाश आणि हवा येण्यासाठी जागा आहे. इतर कैद्यांप्रमाणे मल्ल्याला ग्रंथालय वापरण्याची सुविधा मिळेल. बराक क्रमांक १२ साठी स्वतंत्र जागा असून तिथे फक्त सहा जणांनाच ठेवले जाऊ शकते. त्यामुळे तिथे गर्दी होण्याची शक्यता नाही. आर्थर रोड कारागृहातील सुरक्षा आंतरराष्ट्रीय दर्जाची असून सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. याशिवाय कारागृहात आणि बाहेर दोन्हीकडे सुरक्षारक्षक तैनात आहेत, असे या व्हिडीओतून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्यार्पणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये नैसर्गिक उजेड आणि वैद्यकीय सुविधेवरुन चिंता व्यक्त केली होती. विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण केल्यास त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. भारताने न्यायालयात कारागृहाचे फोटो सादर केले होते. मात्र त्यावरुन आपण अंदाज बांधू शकत नसल्याचे सांगत न्यायाधीशांनी व्हिडीओ मागितला होता.

विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आले होते.